पूर्वतयारी:
१. संक्रांतीच्या आदल्या दिवशी "उद्या गुळाची पोळी करणार आहे बरं का!" असे जाहीर करावे.
२. आॅफिसच्या अर्ध्या वाटेत Indian Store असल्याने नवर्याला सामानाची यादी द्यावी.
३. "एवढा गूळ कुठे खिसत बसायचा? त्यापेक्षा Jaggery Powder आण" असा नवर्याला मेसेज करावा.
४. नवर्याने "आता इथे कशाला हे उद्योग?" असं म्हटल्यावर "तुला आवडतात म्हणूनच करणारे" असं सांगून त्याला गप्प करावं.
साहित्य:
१. नवर्याने आणून दिलेलं सामान
२. Facebook वरच्या आवडत्या group वरची रेसिपी
३. आयत्यावेळी गोंधळ नको म्हणून आईकडून WhatsApp वर मागवलेली रेसिपी, विशेष सूचनांसह
४. मागच्या वर्षी पोळ्या चांगल्या केल्याने आलेला प्रचंड आत्मविश्वास
५. अती उत्साह
कृती :
१. प्रथम नवरा आणि मुलगी यांना ४-५ तासांसाठी बाहेर पाठवून द्यावे.
२. आईच्या रेसिपी प्रमाणे काटेकोर मोजमाप घेऊन कणीक आणि गूळ तयार करावा.
३. गुळाची गोळी न होता भुकटीच झाली आहे हे लक्षात आल्यावर आईला फोन करून "काय करू आता?" असे विचारावे.
४. आईने सांगितलेले सर्व उपाय मनापासून करून बघावे.
५. मधेच नवर्याला फोन करून धोक्याचा इशारा द्यावा.
६. हताश होऊन शेवटी एक कप चहा करावा.
७. Jaggery powder आणल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आहे असा निष्कर्ष निघाल्यावर चला आता काहीतरी भन्नाटच करुयात असे ठरवावे .
८. एका नॉन स्टिक पॅन मध्ये भरपूर तूप घालून तो गूळ गरम करावा. त्यात जास्त करून ठेवलेली तिळाची पूड मिसळावी.
९. गरम असतानाच त्याचे लाडू वळावे.
१०. आपल्या Creativity वर खूष होऊन स्वतःची पाठ थोपटावी.
११. कणकेत तिखट, मीठ, ओवा, धणेपूड, जिरेपूड घालून ती परत मळावी.
१२. जाडसर लाटून cookie cutter ने आकार कापावेत.
१३. ओव्हन मधे खरपूस बेक करून बिस्किटे बनवावी.
१४. "फारच दमायला झालं बुवा" असं म्हणून सर्वांनी १-१ लाडू-बिस्किट खाऊन बाहेर जेवायला जावं.
अशी आमची संक्रांतीची कहाणी सुफळ संपूर्ण! तीळ-गूळ घ्या आणि गोड गोड बोला!
©मेघना खाडीलकर

